नागपूर :राज्य सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र असलेल्या महिला भगिनींना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्यासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित झाला असून यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या अन्न व नागरीपुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.
अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार केंद्रशासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना तसेच’ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ या नावाने राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.