जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांची ग्वाही : कागदपत्रांमध्ये येणाऱ्या अडचणींचा केला निपटारा
नागपूर: केळीबाग रस्ता रूंदीकरणाबाधीत मालमत्ता धारकांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार, कागदपत्रांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. केळीबाग रस्ता रूंदीकरणाबाधीत मालमत्ताधारकांची बैठक मंगळवारी (ता.27) महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यतेखाली आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर प्रवीण दटके, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुनील जोशी, सहायक आयुक्त महेश धामेचा, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, अधीक्षक भूमी अभिलेख जी.बी.दाबेराव, नगरभूमापन अधिकारी अनिल फुलझेले, उपअभियंता रवींद्र बुंदाडे, नगररचना विभागाचे उपअभियंता उज्ज्वल धनविजय प्रामुख्याने उपस्थित होते.
केळीबाग रस्ता रूंदीकरणाबाबतचा प्रस्ताव हा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या रस्त्याची रूंदी 24 मीटर इतकी आहे. एप्रिल 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची रस्ता रूंदीकरणास 24 मीटर रूंदीप्रमाणे मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने थेट खरेदीने भूमीअधीग्रहणाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून थेट खरेदीने मोबदला राशी ही रेडीरेकनरच्या 250 टक्के इतकी आहे. गांधी पुतळा ते सीपी अण्ड बेरार या रस्ता मार्गात एकूण 151 मालमत्ता असून त्यात 43 मालमत्ता या सरकारी तर 108 मालमत्ता या खासगी आहे. त्यापैकी 65 मालमत्ताधारकांची भूमी अधिग्रहीत करण्याबाबत सहमती प्राप्त झाली आहे. भूमी अधीग्रहण करताना थेट संमतीने भूमी अधीग्रहण आणि कंपल्सरी भूमी अधीग्रहण अशा दोन भागात भूमी अधीग्रहणाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. कंपल्सरी भूमी अधीग्रहणामध्ये त्याचा मोबदला हा कमी स्वरूपाचा म्हणजे (200 टक्के) मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
या रूंदीकरणाबाबतच्या कार्यवाही ही अंतीम टप्प्यात असून सर्व मालमत्ताधारकांच्या समस्या सोडविण्यात महापालिका कर्मचारी व अधिकारी, सिटी सर्व्हेचे अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना सहकार्य करावे, तसेच त्यांच्या सर्व प्रश्नांना संयमाने उत्तर दयायचे, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. मालमत्ताधारकांनी 10 सप्टेंबर पर्यंत आपली सर्व कागदपत्रे महापालिका झोन कार्यालयात जमा करावे, असेही आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. ज्या मालमत्ताधारकांचे जागेसंबंधी वा कागदपत्रांसबंधी काही वाद असतील त्यांनी अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्यासमक्ष जाऊन जागेसंदर्भातील वाद सोडवावे, असेही आय़ुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
यावेळी श्रीराम जोशी, राजे संग्रामसिंह भोसले, संजय शिरपूरकर, शिवराजसिंह राजे भोसले, श्री.भागडीकर, महालक्ष्मी देवस्थान पदाधिकारी, मदन देशोत्तर, देवेंद्र पाटील, दत्तात्रय भगत, सुनील कुलकर्णी आदींनी आपल्या अडचणी मान्यवरांपुढे मांडल्या. त्यांच्या शंकाचे समाधानही यावेळी करण्यात आले.