हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
सहा महिला पोलीस विश्रांती कक्षांचे उद्घाटन
पोलीस नूतनीकरण निवासस्थानांचे लोकार्पण
नागपूर: राज्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच बदलत्या काळातील गुन्ह्यांचे स्वरुप लक्षात घेऊन गुन्हे अन्वेषणाकरिता आधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी पदभरती करण्यात येत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सांगितले. नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित पोलीस विभागाच्या विविध इमारतींच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्यातील पोलीस दल कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष असून, कोविड काळात पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विपरीत परिस्थितीतही कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच राज्यात पोलिसांसाठी एक लाख निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. याकरिता यंदा अर्थसंकल्पात 700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये भविष्यात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल, असे गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले. तसेच राज्य शासनाने महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेतला आहे. सोबतच मनुष्यबळ वाढविण्यासाठी बारा हजार पोलिसांची भरती करण्यात येत आहे. सध्या पाच हजार 200 पदांची भरती प्रक्रिया सुरु असून उर्वरित पदभरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस दलात रुजू झालेला शिपाई हा नंतर पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त होईल, याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासोबतच पोलिसांचे प्रश्न, प्रशासकीय बाबी सोडविण्यासाठी, पोलिसांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे, असे गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले. नागपुरात पोलिसांची वाहने, महिला पोलिसांच्या विश्रांती कक्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘स्मार्ट पोलिसिंग’वर भर देण्यात येत आहे. गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे, गुणवत्तापूर्ण तपास करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे, असे त्यांनी सांगितले.
युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जावू नये, यासाठी पोलीस विभागाने योग्य पावले उचलावीत. नक्षलवाद, दहशतवाद्यांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईप्रमाणेच याविरोधात सुद्धा कठोर भूमिका घ्यावी, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा विधेयक नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशात मंजूर करून घेण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड काळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजाविले. पोलिसांना चांगला निवारा मिळावा, यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवासस्थानाबाबतच्या कामांना प्राधान्य दिले. महिला पोलिसांसाठी विश्रांती कक्ष स्थापन करण्यात आले, ही चांगली बाब आहे. पोलिसांच्या जुन्या निवासस्थानांचे नूतनीकरण गरजेचे होते, ते झाल्याने पोलिसांना चांगली घरे उपलब्ध झाली असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
नागपूर पोलिसांना दुचाकी, सीसीटीव्ही, आठ पोलीस ठाण्यात महिला पोलिसांसाठी विश्रांती कक्ष यासह आवश्क साधनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यासाठी यापुढेही निधी दिला जाईल, असे पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले. शहराचा झपाट्याने विकास होत असून लगतची कामठी, बुटीबोरी, वाडी आणि हिंगणा ही शहरेही आता वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात उद्घाटन होत असलेल्या इमारतींविषयी माहिती दिली.
महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळामार्फत लाल व हुडको बिल्डींग येथील नूतनीकरण केलेली 288 निवासस्थाने, हुडकेश्वर पोलीस ठाणे इमारत, गिट्टी खदान पोलीस ठाण्यातील महिला पोलीस विश्रांती कक्षांचे कोनशीला अनावरण व उद्घाटन गृहमंत्री श्री. वळसे पाटील, पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. तसेच वनामती सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी अंबाझरी, सोनेगाव, अजनी, यशोधरानगर, गणेशपेठ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस विश्रांती कक्ष, हिंगणा पोलीस ठाणे अंतर्गत कान्होलीबारा, गुमगाव (वागधरा) येथील पोलीस चौकी व पोलीस अंमलदार निवासस्थानांचे उद्घाटन केले.
महिला पोलीस विश्रांती कक्ष, नूतनीकरण करण्यात आलेली निवासस्थाने यांची चावी प्रातिनिधिक स्वरुपात संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. नूतनीकरण करण्यात आलेली निवासस्थाने, विश्रांती कक्ष आणि पोलीस ठाणे इमारतींची बांधकामे केलेल्या अभियंत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये धनंजय चामलवार, जनार्धन भानुसे, दिलीप देवडे आणि हेमंत पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांनी मानले.