Published On : Wed, Aug 16th, 2017

फ्लाय ॲश क्लस्टरद्वारे रोजगार निर्मितीस चालना देणार – पालकमंत्री बावनकुळे

Advertisement
 
  • कोराडी आणि खापरखेडा येथे देशातील पहिल्या फ्लाय ॲश क्लस्टरचे उद्घाटन
  • उभारणीचे काम डिसेंबर 2017 अखेर पूर्ण होणार
  • महाजेनकोतील कंत्राटी कामगारांसाठी 12 हजार घरे उपलब्ध करुन देणार
  • क्लस्टरद्वारे रोजगार निर्मितीसही चालना मिळणार


नागपूर: फ्लाय ॲशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व वीट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येत असून डिसेंबर 2017 अखेर कोराडी व खापरखेडा येथील फ्लाय ॲश क्लस्टरची उभारणी पूर्ण करुन या अंतर्गतच्या उद्योंगाद्वारे रोजगार निर्मितीस चालना देण्यात येईल, असे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

वारेगाव (खापरखेडा) येथील फ्लाय ॲश इंडस्ट्रियल क्लस्टर तथा फ्लाय ॲश इनक्यूबेशन, संशोधन व कौशल्य विकास केंद्र (कोराडी) याचे भूमीपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार कृष्णा खोपडे, ॲड. सुलेखा कुंभारे, महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, विकास जयदेव, संतोष आंबेरकर, कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे, कैलास चिरुटकर, अनिल नंदनवार, राजू बुरडे, संचालक सुधीर पालीवाल, अनिल पालमवार, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण माथुरकर, खैरीच्या सरपंच कविता आदमने, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, खापरखेड्याच्या सरपंच अनिता मुरोडिया, पोटा-चनकापूरचे सरपंच ढगे, कोराडीच्या उप सरपंच अर्चना दिवाने, कोराडी महादुला नगरपालिका अध्यक्ष जयस्वाल तसेच व अन्य मान्यवर उपस्थित होते.


ऊर्जा, नवीन व नवीकरणीय तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फ्लाय ॲशच्या वापरासंदर्भात राज्य सरकारने तयार केलेले धोरण केंद्र स्तरावरही गौरविले गेले असून हे धोरण देशातही राबविण्यात येणार आहे. फ्लाय ॲशचा वापर अधिकाधिक वाढवून सिमेंट व वीट उद्योगातील कार्बन उत्सर्जन कमी करणे, औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावणे तसेच फ्लाय ॲश क्लस्टरमधील उद्योंगाद्वारे रोजगार निर्मिती करुन अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. ‘महाजेनको’ने त्यांच्याकडील उपलब्ध जागेचा परिपूर्ण उपयोग करत व्यवसायिक प्रकल्पांना चालना द्यावी. परिसरात वृक्षारोपणांतर्गत पाच लाख झाडे लावावीत. तसेच बांबू उद्यानाची निर्मिती करावी. राखेची उपयोगिता वाढविण्यासाठी सिमेंट कंपन्यांबरोबर करार करावे. फ्लाय ॲश क्लस्टर प्रकल्पांतर्गत उद्योगांना स्थानिक तरुणांना रोजगारात सामावून घेणे बंधनकारक राहील. या बेरोजगार तरुणांसाठी क्लस्टरमधील उद्योगांनी कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे अपेक्षित आहे. नागपुरातील कुंभार व्यावसायिकांना क्लस्टरमध्ये जागा देऊन त्यांना तंत्रज्ञान व प्रशिक्षण देण्यात येईल. या क्लस्टरमध्ये तयार होणाऱ्या वीटांचा वापर नागपुर सुधार प्रन्यासने बांधकामासाठी करावा अशी सुचना ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी केली. ‘महाजेनको’तील कंत्राटी कामगारांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 12 हजार घरे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात महाजेनकोने नियोजन करण्याचे निर्देशही ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

Today’s Rate
Tues 19 Nov. 2024
Gold 24 KT 75,800 /-
Gold 22 KT 70,500 /-
Silver / Kg 91,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यंदा अद्यापपर्यंत पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. यामुळे खापरखेड्यातील वीज केंद्रासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी पाण्याचे साठे निर्माण करणे व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे यासारख्या उपाययोजना कराव्या लागतील. भांडेवाडी सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातील पाणी खापरखेडा वीज केंद्रापर्यंत आणावे लागेल असेही पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.


‘महाजेम्स’चे व्यस्थापकीय संचालक श्याम वर्धने म्हणाले, फ्लाय ॲशवर आधारित उद्योगांसाठी कोराडी व खापरखेडा येथे क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच क्लस्टर ठरणार आहे. फ्लाय ॲशच्या पूर्ण वापरावर भर देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले असून बांधकामासाठीही फ्लाय ॲशचा वापर करणे गरजेचे आहे. राज्यातील सातही औष्णिक वीज निर्मिती केंद्रात या क्लस्टरसाठी जागांची निश्चिती करण्यात आली असून येथील उद्योगांना डी+ दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे या क्लस्टरद्वारे रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे. या माध्यमातुन नागपूर शहरातील परंपरागत कुंभार व्यवसायिकांना पर्यायी जागा तसेच उद्योग उभारणीची संधी मिळेल असेही श्री. वर्धने यांनी सांगितले.

सूत्रसंचालन मिलिंद रहाटगांवकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी केले.

Advertisement