Published On : Tue, Jun 12th, 2018

मुख्यमंत्र्यांच्या कॅनडा दौऱ्याला उत्साहवर्धक प्रतिसाद; महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार

Advertisement

मुंबई: कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्यूबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने आज महत्त्वपूर्ण यश मिळवले. आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटी संस्थांचे सहकार्य महाराष्ट्राला लाभणार असून राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्सची उभारणी होणार आहे.

मुख्‍यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. आज कॅनडामधील मॉन्ट्रिएल येथे क्यूबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड आणि मुख्यमंत्री यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात वापर करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात घेतलेल्या भरारीची श्रीमती अँग्लेड यांनी प्रशंसाही केली.

Advertisement
Monday's Rate
Sat 23 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटीसोबत सामंजस्य करार
क्यूबेक सरकारचा निसर्ग तंत्रज्ञानविषयक उपक्रम असलेली ‘एफआरक्यूएनटी’ संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात क्यूबेक सिटी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारावेळी ‘एफआरक्यूएनटी’चे रेमी क्यूरिऑन उपस्थित होते. या कराराप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे. या अभ्यासगटाच्या माध्यमातून कीड निर्मूलन, कृषी तंत्रज्ञान आणि माती व्यवस्थापनासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नेक्स्ट एआय संस्थेसोबतच्या सामंजस्य करारावर देखील स्वाक्षरी करण्यात आली. राज्यातील 50 स्टार्टअप्सना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत नेक्स्ट एआय ही संस्था काम करणार आहे. ‘नेक्स्ट एआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शेल्डोन लेव्ही यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्स
मॉन्ट्रिएल येथे क्युबेकमधील इन्स्टिट्यूट ऑफ डाटा व्हॅलोरायझेशनचे (आयव्हीएडीओ) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिलेस सॅवर्ड यांच्यासोबत आज महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची व्यापक चर्चा झाली. आयव्हीएडीओच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रातील सुमारे एक हजार संघटना एकत्रित काम करीत असून यातून मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि आयव्हीएडीओ यांच्यात महाराष्ट्रात आर्टिफिशियल एक्सलेटर्सच्या स्थापनेबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला. चर्चेत निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे आर्टिफिशियल इंटिलिजन्ससंदर्भातील जागतिक प्लॅटफार्मशी महाराष्ट्र जोडला जाणार आहे. आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर्स तयार करण्यासाठी आयव्हीएडीओसोबत महाराष्ट्रातील आयआयटी आणि विद्यापीठे एकत्रितपणे काम करतील. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.

‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’मुळे रोजगारनिर्मिती होणार
आर्टिफिशियल इंटिलिजन्समुळे रोजगारसंधी कमी होण्याची शक्यता पूर्णपणे निराधार असून उलट यामुळे मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती होईल. अनेक समस्यांचे निराकरण होऊन गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी भरून निघेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम ऑफ द अमेरिकाच्या वतीने आयोजित प्रशासन आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. क्यूबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड, युबीसॉफ्टचे कार्पोरेट अफेअर्स उपाध्यक्ष फ्रान्सिस बेटलेट आणि गुगल कॅनडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेरी जोस लॅमोथ यावेळी उपस्थित होत्या. माहितीची विसंगती पाहता सर्वसामान्यांना प्रदान करावयाच्या सेवांच्या संदर्भात सुद्धा ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’चा वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुर्गम भागात रूग्णाचे निदान करण्यासाठी या प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सेवा प्रदान करताना तंत्रज्ञानाचा वापर आणि हवामान बदलाच्या युगात शाश्वततेसाठी तंत्रज्ञानाची निकड, तंत्रज्ञानाच्या वापरात सरकारची भूमिकाही त्यांनी मांडली.

‘कॅनडातील उद्योग समूहांनी राज्यात गुंतवणूक करावी’
भारतासह महाराष्ट्र अतिशय वेगाने प्रगती करीत असून या विकासपर्वात भागीदारी करण्यासाठी कॅनडातील उद्योग समूहांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज क्युबेक सिटी येथे केले. कॅनडा-इंडिया बिझनेस कौन्सिलच्या (सीआयबीसी) वतीने आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त विकास स्वरूप, कॅनडाचे मुंबईतील कॉन्सूल जनरल जॉर्डन रिव्हज उपस्थित होते. कॅनडातील भारतीय गुंतवणूकदारांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाराष्ट्राची बलस्थाने आणि विकासयात्रेची यशोगाथा मांडतानाच मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अनेक प्रकल्पांमुळे आकारास येणाऱ्या तिसऱ्या मुंबईची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘महाराष्ट्र भारतासाठी ‘पॉवरहाऊस’च्या भूमिकेत’
कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पेरिन बेट्टी यांनी आज सायंकाळी मॉन्ट्रिएल येथे इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम ऑफ द अमेरिकाच्या वतीने आयोजित परिषदेत ‘स्पर्धात्मक युगात जागतिक विकास’ या विषयावर मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आज भारतातील अनेक राज्ये परस्परांशी स्पर्धा करीत विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करीत आहेत. आज सर्वच राज्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करीत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र हे भारताचे ‘पॉवरहाऊस’ असून राज्याची बलस्थानं आम्ही अधिक समृद्ध केली आहेत. भारतातील एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी 47 टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात येते. देशातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी 51 टक्के प्रकल्प हे एकट्या महाराष्ट्रात सुरू आहेत. आम्हाला 2025 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था म्हणून पुढे यायचे आहे. प्रधानमंत्र्यांनी देशाला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पाहिले आहे आणि त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

दरम्यान, क्यूबेकच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारमंत्री क्रिस्टिन सेंट पीअर यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.

Advertisement