नागपूर : राज्यातील सर्व ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यात येईल, असे विधान उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केले. गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीत ते शहरात आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. यासंदर्भात फडणवीस भाष्य करत वरील विधान केले आहे.
राज्यातील ज्या ऐतिहासिक किंवा धार्मिक ठिकाणी अतिक्रमण झाले असेल त्या सर्व ठिकाणांवरील अतिक्रमण टप्प्या टप्प्याने हटवण्यात येईल, असे ते म्हणाले.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असून तेथे शासनाच्यावतीने विविध उद्योग सुरू करण्यात आले आहे. हा जिल्हा आता औद्यगिक हब होऊ पाहतो आहे. हे लक्षात घेऊन या जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल.
गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल. या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे. तेथे जून २०२४ पासून प्रवेश कसे सुरू करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.