जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सूचना
नागपूर: प्राणीक्लेष सुरक्षा अधिनियिमांतर्गंत प्राण्यांची सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक असून, प्राण्यांना अनावश्यक वेदना अथवा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी दिल्यात.
छत्रपती सभागृह येथे जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची बैठक श्री. फडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलीक, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, उपशिक्षणाधिकारी यु. के. राठोड, पशुचिकित्सा अधिकारी गजेंद्र महल्ले, अशासकीय सदस्य अंजली वैद्यार, करिष्मा गलानी, अखिल रोकडे, हेमंत बहेले, लोकेश रसाळ, प्रदिप कश्यप आणि दिपक सरक उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या वन्य प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणा-या अधिनियमांतर्गंत पाळीव प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे प्राणीक्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. याअंतर्गंत घटना घडत असल्यास पोलिस विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती देण्यात यावी, यासाठी टोलफ्री क्रमांकसुद्धा देण्यात आला असल्याचे यावेळी श्री. फडके यांनी सांगितले.
बैठकीत शासन अधिसूचनेनुसार प्राणी कल्याणविषयक कार्य करणा-या सेवाभावी संस्थेच्या सदस्य म्हणून अंजली वैद्यार यांची सर्वानुमते नियुक्त करण्याबाबत अनुमोदन देण्यात आले.