कोराडी : वीज क्षेत्रातील अभियंत्यांनी नवनवीन आव्हाने, तांत्रिक बाबींबाबत कुतूहल, सूक्ष्म निरीक्षण, टेक्नो कमर्शियल विचार, मानव-मशीन सुसंवाद आणि सांघिक कार्यातून वीज उत्पादनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे हीच आजच्या अभियंत्यांची प्रमुख भूमिका असल्याचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी प्रतिपादन केले. कोराडी वीज केंद्रात अभियंता दिनी ते बोलत होते.
वीज क्षेत्र हे पूर्णत: तांत्रिक स्वरूपाचे क्षेत्र असल्याने अभियंता दिनाला विशेष महत्व आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनी देशभर अभियंता दिन साजरा करण्यात येतो.
याप्रसंगी उप मुख्य अभियंता विराज चौधरी म्हणाले की, अभियंत्यांनी व्यवस्थापन कौशल्य आणि लहान-सहान बदल करण्याची वृत्ती वाढविणे गरजेचे आहे तर प्रभारी उप मुख्य अभियंता डॉ. विलास मोटघरे म्हणाले की, अभियंत्यांनी सातत्याने ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी रिफ्रेशर कोर्स, प्रमाणित कार्यपद्धती, ड्रॉइंग वाचन करण्याची गरज आहे. अधीक्षक अभियंता अंकुर जोशी यांनी सांगितले की, दैनंदिन कामकाजात तांत्रिक आणि प्रशासकीय कौशल्याचा अधिकाधिक वापर करणे तितकेच महत्वाचे आहे. कार्यकारी अभियंता जितेंद्र खंडाळे यांनी ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने आणि महानिर्मितीची भूमिका यावर प्रकाश टाकला तर कार्यकारी अभियंता अतुल बनसोड यांनी तांत्रिक पुस्तके, वाचन संस्कृतीचे महत्व अधोरेखित केले.
अभियंता दिन कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रर्दशन प्रविन बुटे यांनी केले तर कार्यक्रमाला अधिक्षक अभियंते अशोक भगत, कमलेश मुनेश्वर, अंकुर जोशी, चंद्रमणी, विभाग प्रमुख अधिकारी, अभियंते कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.