Published On : Fri, Aug 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

गणेश मंडळाच्या परवानगीसाठी संपूर्ण शुल्क माफ

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार मनपाचा निर्णय
Advertisement

नागपूर : येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांकडून आकारण्यात येणारे विविध प्रकारचे सर्व शुल्क माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे घेण्यात आलेला आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजीत पवार यांचेकडून प्राप्त निर्देशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी शुल्क माफ करण्याचा निर्णय जारी केला आहे.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुकतांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित केली आहे. त्यामध्ये गणेशोत्सव २०२४ गणेश मंडळाच्या परवानगीसाठी आकारण्यात येणारे अर्ज पडताळणी व निरिक्षण शुल्क २०० रुपये तसेच अनामत रक्कम १००० ते ५००० रुपये पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशान्वये तसेच मनपाद्वारे केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागपूर शहरात श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याच्या दृष्टिने २०२४ च्या गणेशोत्सवाकरीता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी खालीलप्रमाणे धोरण/मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

१. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दि. १२/०५/२०२० रोजीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पीओपी मूर्ती बनविण्यावर/उत्पादनावर बंदी असून पीओपी मूर्ती खरेदी करु नये. नागरिकांनी पर्यावरणपूरक साहित्याने निर्माण केलेल्या मातीच्या मूर्तीची स्थापना करावी.
२. निवासी संकुल/संस्था/घरकुल येथे ‘एक संकुल एक गणपती’ एक श्री गणेशाची स्थापना करण्याची संकल्पना राबवावी. मिरवणुकीत ध्वनी पातळी मानकाप्रमाणे नियंत्रित ठेवून ध्वनी प्रदूषण टाळावे.

३. सर्व मुर्तीकार/कलावंतानी मुर्तीची निर्मिती करण्याकरीता मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोंदणी/परवाना घ्यावे.

४. शहरातील नैसर्गिक जलाशयाचे स्त्रोत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मुर्तीचे विसर्जन करु नये. मनपा हद्दीतील संपूर्ण तलाव विसर्जनाकरीता प्रतिबंधित करण्यात आले असून भावीकांनी मुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे.

५. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निबंध २०२४च्या

गणेशोत्सवाकरीता असणार नाही. तथापी गणेश विसर्जन फक्त कृत्रिम तलावामध्येच करावयाचे असल्याने ज्या सार्वजनिक मंडळाचे गणेश मूर्ती ४ फुटापेक्षा जास्त असतील त्यांना विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिका हद्दीचे बाहेर करावे व तसेच संबंधीत पोलिस विभागाला कळवून रितसर मिरवणुकीची परवानगी घ्यावी.

६. घरगुती गणेश मुर्तीसाठी या अगोदर २ फूट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती. यावर्षी घरगुती गणेश मुर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. परंतू घरगुती मुर्तीच्या उंचीवर स्वखुशीने २ फूट उंचीची मर्यादा पाळण्यात यावी.

७. मूर्तीची निर्मिती करताना घातक व अविघटनशील रासायनिक रंगाचा वापर करु नये. मूर्ती तयार करताना शक्यतो पर्यावरणपूरक रंगाचा वापर करावा. मुर्तीच्या सजावटीकरीता प्लॉस्टीक व थर्माकोलचा वापर करु नये.

८. विक्रेते पीओपी मुर्तीची निर्मिती, भांडारण, वापर व विक्री करताना आढळुन आल्यास मूर्ती जप्त करुन विक्रेत्यावर रु. १०,०००/- दंड/शास्ती आकारण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

९. गणेशोत्सव २०२४ गणेश मंडळाच्या परवानगीसाठी आकारण्यात येणारे अर्ज पडताळणी व निरिक्षण शुल्क रु. २००/- व अनामत रक्कम रु. १०००/- ते ५०००/- पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

१०. यासोबतच गणेशोत्सव २०२४ करीता गणेश मंडळाच्या मंडपाच्या परवानगीसाठी अग्निशमन विभागाचे शुल्क, मंडप उभारणीबाबत उद्यान खाते, मालमत्ता व खाजगी भुखंडावर आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात आले आहे.

११. गणेश मंडळाचे नोंदणी करण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात येईल. गणेश मंडळाने या लिंकवर नोंदणी करावी तसेच गणेश मंडळाचे सोई व सुविधेकरीता झोननिहाय Facilitation Center उभारण्यात यावे.

१२. पारंपारीक मुर्तीकार संघ यांच्या मागणीनुसार अनामत रक्कम रु. ५०००/- पूर्णतः माफ न करता रु. ५००/- आकारण्यात येत आहे.

१३. मुर्तीकार संघटनेच्या मागणीनुसार शहरातील सार्वजनिक जागेची निवड करुन त्या जागेवर पर्यावरणपूरक मातीच्या मुर्तीचे विक्री केंद्र उभारण्याकरीता जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागेवर पेन्डाल निर्मिती करुन दिल्यास १०X१० फूट आकाराचे पेन्डालकरीता अंदाज रु. १०००/- प्रति पेन्डाल/प्रतिदिवस नुसार शुल्क आकारण्यात येईल.

१४. पूजा आयोजक समिती/गणेश उत्सव मंडळ, व्यक्ती या गणेश उत्सवामध्ये आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे आयोजित करण्यात प्राधान्य देणे आणि मलेरिया, डेंग्यू व हत्तीरोग आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता व कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

१५. कृत्रीम विसर्जन स्थळी नागपूर महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाईची व्यवस्था तसेच आगमन व विसर्जन रस्त्यावर संबंधीत वीज पुरवठादार यांच्यामार्फत वीजेच्या व्यवस्थेबाबत आवश्यक ती सुधारणा (दिवा बत्तीची संख्या व क्षमता) करण्यात यावी.

१६. गणेशोत्सव २०२४ करीता साफ सफाई शुल्क रु. ५००/- पुर्णपणे माफ करण्यात आले आहे.

१७. शहरातील सर्व तलावामध्ये विसर्जनावर बंदी घालण्यात येते व तलाव संरक्षीत करण्याकरीता बॅरीकेटिंग करण्यात येतील.

१८. श्री गणेश विसर्जनस्थळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येईल. १९. श्री गणेश विसर्जन स्थळी अग्निशमन अधिकारी यांच्यामार्फत अग्निशमन दलासह जलतरणपटूची व्यवस्था केली जाईल.

२०. गणेशात्सव २०२४ करीता गणेश मंडळ परवानगीकरीता आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात आले असले तरी विविध परिपत्रकामध्ये (शासनाची/मनपाचे) असलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील. उदा. अग्निशमन दलाच्या शर्ती, अनुज्ञापन खात्याच्या अटी व शर्ती, प्लास्टिक व थर्माकोल बंदीबाबत शासकीय निर्देश इत्यादीचे पालन करणे आवश्यक आहे.

Advertisement