नागपूर : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज नागपूर दौऱ्यावर आहेत.कौशल्य विकास केंद्र आणि मत्स्यव्यवसाय महाविद्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, मॅट्स महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर त्या जागतिक प्राणी पोषण विज्ञान परिषद आणि प्रदर्शनात सहभागी होतील.
नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ बीडसाठी सर्वात विकासात्मक असल्याचे म्हटले. पालकमंत्रीपदाच्या निर्णयाबद्दल तक्रार न करता, जालन्यातही चांगले काम करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
बीडचे पालकमंत्री तुम्हाला न देता अजित पवार यांना दिले गेले आहे, असे माध्यमांनी पंकजा यांना विचारले. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, कधीही एकसारखेच काम करायला मिळते असे नाही. जसे मागील पाच वर्षे मी पूर्णत: संघटनेचे काम केले. कोणत्याही संविधानिक पदावर मी काम करत नव्हते.
राहिला विषय बीडच्या पालकमंत्रिपदाचा तर मी बीडची लेक आहे. जर बीडची सेवा करण्यास मिळाली असती तर मला आनंद झाला असता. बीडकरांना देखील खूप आनंद झाला असता, असे पंकजा म्हणाल्या.