– नागपूरमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) या महत्त्वाच्या प्रशिक्षण संस्था आहेत.यात भर घालत युवकांच्या स्वयंपूर्णतेसाठी नागपूरमध्ये राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID) स्थापन करा अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी केली.
NIDची स्थापना झाल्यास ही संस्था चौथा आधारस्तंभ म्हणून भूमिका बजावेल. याशिवाय कुशल मनुष्यबळाची निर्मिती होऊन स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. या संस्थेमुळे व्यवसायाला चालना मिळेल, तसेच भविष्यात विविध उद्योगांना आकर्षित करून उपराजधानीत गुंतवणूक वाढीसाठी मदत होईल. येथील युवकांचे रोजगाराच्या निमित्ताने होणारे स्थलांतर थांबेल, असा विश्वासही विशाल मुत्तेमवार यांनी व्यक्त केला.
विदर्भ क्षेत्राचा विकास व स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन नागपूरमध्ये एनआयडीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी विशाल मुत्तेमवार यांनी केली आहे.