नागपूर : भाजप नेत्या सना खान प्रकरणी रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहे. मानकापूर पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहू विरोधात आणखी एक गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सना खान (Sana Khan) प्रकरणात हनी ट्रॅपचे वळण आले आहे.
याप्रकरणी अमित साहू आणि त्याचे नागपूर आणि जबलपूरमधील काही सहकारी अशा अज्ञात लोकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींमध्ये सना खानच्या आईचा आक्रोश पहिल्यांदाच पाहायला मिळाला. प्रसार माध्यमांशी बोलताना सना खानच्या आईने याप्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सनाची आई मेहरुन्निसा म्हणाल्या की, माझ्या मुलीच्या हत्येला २४ दिवस उलटले तरी मृतदेह का मिळाला नाही ? हे प्रकरण हनी ट्रॅपशी का जोडले गेले, असा सवाल सनाच्या आईने प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केला.
नागपुरातील भाजपा नेत्या सना खान यांच्या हत्येला जवळपास २४ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही सना खान यांचा मृतदेह पोलिसांना मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी हरदा जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मात्र हा मृतदेह सना खान यांचा नसल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती.
२ ऑगस्टनंतर सना खान यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. जबलपूर येथील अमित साहूसोबत सना खान यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. आरोपी अमित याने रागाच्या भरात सना खान यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर सना खान यांचा मृतदेह अमित साहूने हिरण नदीत फेकून दिल्याचे सांगितले होते. गेल्या आठ दिवसांपासून सना खानच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मात्र सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.