मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते सुरेश भैय्या जी जोशी यांनी मुंबईत केलेल्या विधानामुळे संतापाची लाट उसळली आहे. मराठीबद्दल बोलताना भैय्या जी जोशी म्हणाले, ‘मुंबईला कोणतीही एक भाषा नाही. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी किंवा इथे राहण्यासाठी मराठी शिकण्याची गरज नाही. याठिकाणी गुजराती भाषेनेही काम चालेल आरएसएस नेत्याच्या या विधानामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरातीला सांगितले घाटकोपरची भाषा-
भैयाजी जोशी म्हणाले, मुंबईत फक्त एक नाही तर अनेक भाषा आहेत. मुंबईच्या प्रत्येक भागाची स्वतःची भाषा आहे. घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. म्हणून जर तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा इथे येऊ इच्छित असाल तर तुम्हाला मराठी शिकण्याची गरज नाही.
विरोधकांनी घेतला आक्षेप –
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आरएसएस नेत्याच्या या विधानाचा विरोध केला आहे. ठाकरे म्हणाले, ‘मुंबई असो किंवा महाराष्ट्र आपली मातृभाषा मराठी आहे. तामिळनाडू किंवा इतर कोणत्याही राज्यात, तमिळप्रमाणेच, मराठी हा देखील आपला अभिमान आहे. भैयाजी जोशी यांनी गुजराती भाषेचे वर्णन घाटकोपरची भाषा असे केले आहे. पण हे अस्वीकार्य आहे.मराठी ही आपल्या मुंबईची भाषा असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई तोडण्याचा प्रयत्न: आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संघ नेत्याच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “केम छो , केम छो “, असे वाटते की हे एकमेव गाणं आहे जे आता मुंबईत ऐकायला मिळेल. भैय्याजी जोशी भाषेच्या मुद्द्यावर मुंबईचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात आव्हाड यांनी केला.
मराठी भाषा संस्कृती-अस्मितेचा एक भाग: फडणवीस
मराठी भाषेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर विधान केले आहे. ते विधानसभेत म्हणाले, मुंबई, महाराष्ट्र आणि राज्य सरकारची भाषा मराठी आहे. इथे राहणाऱ्या लोकांनी हे शिकले पाहिजे. मराठी भाषा ही राज्याच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा एक भाग आहे आणि ती शिकणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असले पाहिजे.
विधानसभेत भाजप आणि शिवसेना वादंग –
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर सभागृहात शिवसेना (यूबीटी) आणि भाजप सदस्यांमध्ये जोरदार वादविवाद झाला. वादविवाद इतका वाढला की कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.