मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश : फटाके टाळा, नियम पाळा
नागपूर : अवघ्या तीन दिवसावर दिवाळी येउन ठेपली आहे. अशात शहरात अनेक भागात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे, ही अत्यंत चुकीची बाब आहे. दिवाळी हा आनंदाचा सण आहे. हा आनंद साजरा करताना इतरांसाठी तो दु:खाचा काळ ठरू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या शहरात कोव्हिडचा प्रादुर्भाव कमी असला तरी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. दिवाळी साजरी करताना कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
कोव्हिड संसर्गाच्या प्रादुर्भावात सुरक्षितरित्या दिवाळी साजरी करण्याबाबत मंगळवारी (ता.१०) आयुक्तांनी आदेश निर्गमित केले. या आदेशानुसार प्रत्येकाने नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. याशिवाय दिवाळीत फटाके न फोडण्याचेही आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मनपा आयुक्तांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व रुग्णालये, उद्याने, वृद्धाश्रम, शाळा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजाराची ठिकाणे, शासकीय तथा निमशासकीय कार्यालये यासह मनपाद्वारे जाहिर करण्यात आलेल्या ‘सायलेंट झोन’मध्ये कोणत्याही प्रकारची फटाके फोडता येणार नाही. कोव्हिड बाधितांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास होउ नये यासाठी मोठ्या आवाजाची फटाके (जसे सुतली बॉम्ब इ.) फोडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढते, त्यामुळे जनसामान्यांसह प्राणीमात्रांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पुढे दिसून येतो. वायू प्रदूषणामुळे काव्हिडबाधितांना धोकाही निर्माण होउ शकतो, त्यामुळे नागरिकांनी फटाक्याचा कमीत कमी करावा, शक्यतो टाळावा.
फटाके, दिवे लावताना सॅनिटायजर टाळा
कोव्हिडच्या अनुषंगाने वापरण्यात येणारे सॅनिटायजर दिवाळीमध्ये धोकादायक ठरू शकते. सॅनिटाजर ज्वलनशील असल्याने फटाके फोडताना आणि दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर कुणीही करू नये. हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटाजर ऐवजी साबण किंवा हँडवॉशचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. दिवाळीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सामुदायिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे दिवाळी पहाट व अन्य कार्यक्रम ऑनलाईनरित्याच आयोजित करावे. दिवाळीनिमित्त खरेदी करताना गर्दीची ठिकाणे टाळा. नियमभंग करणारे, मास्क योग्यप्रकारे न लावणे, रस्त्यावर थुंकणे, विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करणे आदींवर दंडात्मक तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल.