नागपूर : राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांनी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिंदे सरकारसोबत हातमिळवणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. ते आज गुरुवारी (६ जुलै) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवारांनी शरद पवारांवर जे काही आरोप केले. त्यावरून असे दिसते की त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे पक्षही अडचणीत आला आणि त्यांच्याबाबतची विश्वासार्हताही कमी झाली. शरद पवारांना कुटुंबातही वारंवार खोटं बोलावं लागलं. म्हणजे या राजकारणापासून कुटुंबही सुटले नाह, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.
अजित पवारांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र आणि देशाच्या हिताची आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या सर्वांनी त्यांना बाहेर का यावं लागले याबाबत भाष्य केले. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्यपरिस्थिती सांगितली आहे.
मी स्वतः पवार कुटुंबातील असून कधी खोटं बोलू शकत नाही, असं अजित पवारांनी नमूद करत गंभीर विधानं केली आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. महाराष्ट्रातील जनताही त्यावर नक्कीच विश्वास ठेवेल,असेही बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.