Published On : Sat, Jul 1st, 2023

स्वभावाचेही ‘मॅनेजमेंट’ गरजेचे! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी संवाद

Advertisement

नागपूर : भविष्यात उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा, मार्केटचा अभ्यास करा आणि सर्वसामान्य लोकांचे भले करणारे संशोधनही करा. हे सारे आवश्यक आहेच. पण लोकांसोबत तुमची वागणूक चांगली नसेल तर त्या यशाचा काहीच उपयोग नाही. मनुष्याचा स्वभाव आणि त्याची वागणूक ही सर्वांत मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर आयआयएमच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय लेखक व व्याख्याते शिव खेरा यांच्या पाच दिवसीय ‘हाय इम्पॅक्ट लिडरशीप प्रोग्राम’चा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ना. श्री. नितीन गडकरी यांनी आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांचीही उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘सत्ता, श्रीमंती, यश यामुळे थोडा फार अहंकार येतो. आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलण्याची भाषा बदलते. तुम्ही सुद्धा इथले शिक्षण पूर्ण करून मोठ्या कंपन्यांमध्ये स्वतःचे करीयर घडविणार आहात. यशस्वी होणार आहात. मात्र यश मिळाल्यावर आपल्या वागणुकीत बदल होऊ देऊ नका. शालीनता आणि नम्रता जोपासा. मानवी संबंधांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे.’ जॉर्ज फर्नांडीस, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, अमिताभ बच्चन यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. ‘टीम तयार करून कामांची विभागणी करण्यावर भर द्या. आपणच सारे काही करू शकतो, असा विचार केल्याने नुकसानच होत असते. बरेचदा यशस्वी माणूस सगळी कामे स्वतःच करायला बघतो आणि त्यानंतर अपयशी होतो,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

Advertisement

प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक
कुठलेही काम पूर्णत्वास न्यायचे असेल तर प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे. पारदर्शकता, वेळेत काम पूर्ण करण्याची वचनबद्धता, निर्णय तत्परता ही सूत्रे पाळली तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.