नागपूर: शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचा-य़ांनी कितीही प्रयत्न केले, तरीही नागरिकांच्या मनात स्वतः आपलं शहर स्वच्छ असावं असे ही भावना असायला हवी. प्रत्येकाला मनापासून ते वाटायला हवं. जो पर्यंत नागरिकांच्या मनात शहराच्या स्वच्छतेबद्दल आपुलकीचा विचार येत नाही तो पर्यंत स्वच्छ व सुंदर शहर साकारणे शक्य नाही. आपल्या व्यस्त दैनंदिनीमधून शहराच्या स्वच्छतेसाठी पुढे आलेल्या पाचही “ब्रॅण्ड ॲम्बेसिडर” चे कौतुक करत त्यांचे आभार महापौर नंदा जिचकार यांनी मानले.
‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’ साठी नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक कमावणा-यांची नियुक्ती मनपातर्फे करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध मेंदुरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्रसिद्ध साहित्यकार, कवी मधूप पांडे, मॅरोथॉनपटू डॉ. अमित समर्थ, ग्रीन व्हीजील संस्थेचे कौस्तभ चॅटर्जी, रेडिओ जॉकी नीकिता साने यांचा समावेश आहे. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे, राजेश कराडे, गणेश राठोड, हरीष राऊत, अशोक पाटील, सुभाष जयदेव, विजय हुमणे, राजू भिवगडे, सुवर्णा दखणे आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये स्वच्छतेसंदर्भातील विविध निकषांवर असलेल्या गुणपद्धतीबद्दलची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. मनपातर्फे या चांगल्या उपक्रमासाठी आपली निवड करण्यात आली असल्याने आपण स्वतःला भाग्यवान समजत असून आमच्या वतीने नागपूर स्वच्छ आणि सुंदर व्हावे, संपूर्ण देशात अव्वल क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत नागपूरचा असावा यासाठी ज्या पद्धतीने योगदान देता येईल, त्या पद्धतीने देऊ. आपआपल्या क्षेत्रात ज्या लोकांशी संबंध येतो, त्या लोकांना नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीचे दायित्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही निवड झालेल्या स्वच्छता ॲम्बेसिडर्सनी यावेळी दिली.
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, स्वच्छता हा विषय आपल्या आरोग्याशी जुळलेला आहे. आपण आपले घर ज्याप्रकारे स्वच्छ ठेवतो, त्याचप्रकारे हे शहर आपले घर समजून या कार्यात हातभार लावायला हवा. जर नागरिकांनी ‘मी कचरा करणारच नाही’ असे ठरविले तर शहर असेच स्वच्छ राहील. आपल्या माध्यमातून महानगरपालिकेने आता ‘नागपूर स्वच्छ’चे स्वप्न बघितले आहे. सर्वांनी मोबाईलवर ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड करा. अस्वच्छतेसंदर्भातील तक्रारी पाठवा आणि स्वच्छ आणि सुंदर शहर साकारण्यासाठी स्वच्छतादूत बना, असे आवाहन केले.
नागपूरची आगेकूच सुरूच; स्वच्छतेत २० वा क्रमांक
४३४ च्या वर शहरांच्या यादीत मागील वर्षी नागपूर ‘स्वच्छ शहर’ म्हणून १३७ व्या क्रमांकावर होते. नागरिकांच्या सहकार्याने मनपा प्रशासनाने प्रयत्नपूर्वक यामध्ये चांगली कामगिरी त्यानंतर बजावली आहे. आता या क्रमांकात सुधारणा झाली असून सद्यस्थितीत २० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, अशी माहिती देत जानेवारी महिन्यात ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’ आहे. यामध्ये टॉप स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूर यावे, यासाठी संपूर्ण नागरिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी केले.