नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेते रतन शारदा यांनी RSS मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये एक लेख लिहिला आहे. यामाध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात भाजपाला मिळालेल्या अपयशावर भाष्य करत पक्षाला खडेबोल सुनावले. भाजपने महाराष्ट्रात अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी करून खूप मोठी चूक केल्याचे ते म्हणाले. यावरून राजकीय चर्चा रंगल्या. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रतन शारदा यांनी पुन्हा एकद प्रतिक्रिया दिली.
भाजप आणि आरएसएसच्या अनेक नेत्यांनी मला संदेश पाठवले आहेत. मी जे लिहिले आहे त्याच्याशी ते सहमत आहेत. सकारात्मक दृष्टिकोन असलेला हा लेख आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युती आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलताना शारदा म्हणाले की, राज्यात भाजपाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केले. हे सरकार सुरक्षित होते. मग भाजपने अजित पवार यांच्याशी हातमिळवणी का केली, असे शारदा म्हणाले.
दलबदलू नेत्यांना समोर आणले गेले. स्थानिक नेत्यांकडे कसे दुर्लक्ष केले गेले. एकीकडे घड्याळ, पंजा, धनुष्यबाण आणि भाजप. दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना ही विचित्र परिस्थिती होती. मतदान करताना लोक संभ्रमात होते. तुमची लॉयलटी कार्यकर्त्यांशी आहे. तुम्हीच गोंधळ निर्माण केला. या निवडणुकीत फक्त मुस्लिम वोट कन्फर्म होती. बाकी सर्व मतदार संभ्रमात होते. हे वातावरण दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा तयार केला पाहिजे. हा नेता तिकडे गेला, तो नेता इकडे आला हे करून चालणार नाही. कोणत्याच नेत्याने या निवडणुकीत विकासाचा ब्ल्यू प्रिंट दिला नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केले.
दलबदलू 69 जागांपैकी 25 टक्के जागा लढवत होते, त्यापैकी त्यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव कोणी केला? जनतेने त्यांचा पराभव केला. त्यामुळे उमेदवार म्हणून कोणाला उमेदवारी दिली जाते, हेही महत्त्वाचे आहे, असेही शारदा म्हणाले.