नागपूर : चीनमधून ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) पसरल्याने आणि त्याचे रुग्ण देशात आढळून आल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. बंगळुरूमध्ये भारतातील पहिल्या ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) रुग्णाची नोंद झाल्यानंतर मंगळवारी नागपुरातही दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या संदर्भात पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली.
अधिक तपासणीसाठी रुग्णाचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) व पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र शहरात सर्व काही नियंत्रणात असून कोणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे इटनकर म्हणाले.
विपीन इटनकर यांनी सांगितले की, आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी आम्ही सर्व रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांना पाठवू. यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन करून सांगितले की, हा नवीन आजार किंवा विषाणू नाही, त्याचा कोविडशी संबंध नाही आणि घाबरून जाण्याची गरज नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती सर्वसामान्यांना द्यावी, असेही ते म्हणाले.
भारतात हा व्हायरस आला कुठून?
डॉ.विपिन इटनकर यांनी माहिती दिली की, हा एचएमपी विषाणू नेदरलँड्समध्ये 2001 मध्ये पहिल्यांदा दिसून आला. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण होते (सर्दीसारखे). हा एक हंगामी रोग आहे जो सहसा हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस होतो.