Published On : Mon, May 28th, 2018

EVM मशीन मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्याः अशोक चव्हाण

ashok-chavan
मुंबई: पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी आज दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर जवळपास 25 टक्के EVM आणि VVPAT यंत्रामध्ये बिघाड झाल्याने तासन् तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ज्या मतदानकेंद्रावर EVM मशीनमध्ये बिघाड झाला त्या सर्व मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावे आणि मतमोजणीवेळी VVPAT स्लीपचीही मोजणी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र आज दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. भाजप कार्यकर्ते खुले आम मतदारांना पैसे वाटत होते, काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग केला. याबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या तरी निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही. मतदानापूर्वी मतदारांना पोल चीट देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे मात्र अनेक ठिकाणी मतदारांना पोल चीट वाटल्या गेल्या नाहीत.

जवळपास 25 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानयंत्रामध्ये बिघाड होणे संशयास्पद आहे. उन्हामुळे व तापमानामुळे मतदानयंत्रे खराब होतात हे निवडणूक आयोगाने दिलेले स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही. देशात यापूर्वी ही अनेकदा उन्हाळ्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दोन आठवड्यापूर्वीच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकाही कडक उन्हाळ्यात मे महिन्यामध्येच पार पडल्या होत्या तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानयंत्रामध्ये बिघाड झाले नव्हते. आज देशभरात विविध ठिकाणी होणा-या पोटनिवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात EVM मशीन खराब झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या EVM मशीन गुजरातमधून आणल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे संशयात अधिक भर पडत आहे. उन्हामुळे मशीन खराब होते तर आयोगाने EVM ऐवजी बॅलेटपेपरवर मतदान का घेतले नाही? असा संतप्त सवाल करून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement