भंडारा: आज होत असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद पडल्याने हजारो मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला नाही. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३४ मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद पाडल्याचा लाभ मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी झोपा काढून घेतला.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात असलेल्या खैरी गावात मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन केवळ १७ टक्के मतदान होताच बंद पडली. ही मशीन दुरुस्त करण्यासाठी इंजिनिअर उपलब्ध नसल्याने मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी याची माहिती मुख्यालयाला दिली. मात्र बराच वेळ होऊनही कुठलाही इंजिनिअर मशीन दुरुस्तीसाठी न आल्याने येथील अधिकारी झोपा काढत असल्याचे दिसून आले. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याने बोलण्याचे टाळले. सध्या ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद पडल्याने आपल्याला मतदानाचा हक्क बजावता आला नसून या ठिकाणी पुनर्मतदानाची मागणी मतदारांनी केली आहे.