नवी दिल्ली:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ. सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली. 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, 22 मे रोजी त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले.
2009 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि 2014 पर्यंत ते या पदावर राहिले. दरम्यान 1971 मध्ये मनमोहन सिंग भारत सरकारमध्ये रुजू झाले आणि वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले.
1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.
मनमोहन सिंग 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. या काळात त्यांनी आर्थिक सुधारणांचे व्यापक धोरण राबवले, ज्याचे जगभरात कौतुक झाले. या सुधारणांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि नवी दिशा दिली.