२५ डिसेंबरपर्यंत मोहिम : बालकांच्या लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन
नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या गोवर लसीकरण विशेष मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेंतर्गत १९ डिसेंबरपर्यंत ५७४ बालकांना गोवर लसीचा पहिला व ५०६ बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यासोबतच १४१३ मुलांना व्हिटॅमिन ‘ए’ चा डोस देण्यात आला आहे.
गोवरचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे लसीकरण होणे आवश्यक असून पालकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान अंतर्गत १५ ते २५ डिसेंबर २०२२ दरम्यान व्यापक लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विविध ठिकाणी लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमे अंतर्गत सोमवार, १९ डिसेंबरपर्यंत २८० लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये ५७४ मुलांना गोवर लसीचा पहिला तर ५०६ मुलांना दुसरा डोस देण्यात आला आणि १४१३ मुलांचे व्हिटामीन ‘ए’चे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती मनपाचे नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.
गोवर हा गंभीर आजार आहे. फक्त पूरळ येणे म्हणजे गोवर नाही तर, गोवर आजारामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमी होणे व यामुळेच इतर आजाराची गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र गोवर लसीकरणामुळे या आजारावर पूर्ण प्रतिबंध करता येतो. याकरीता गोवर लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. करीता आपले बाळ ५ वर्षांखालील असेल व त्याला गोवर लसीचे दोन्ही डोस दिले नसतील किंवा एक डोस सुटला असेल तरी अश्या ५ वर्षापर्यंतच्या बालकांना गोवर लसीचे डोस देता येतील. करीता जवळच्या मनपा किंवा शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.