नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल सकाळी दहाच्या सुमारास विमानतळ संचालकांच्या मेल आयडीवर आल्याने खळबळ उडाली आहे. हा ईमेल प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून नागपूरच्या सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विमानतळ संचालकांनी ई-मेलद्वारे धमकी मिळाल्याची पुष्टी केली असून, हा ई-मेल सकाळच्या कार्यालयीन वेळेत पाठवण्यात आला आहे, असे ई-मेल अनेक विमानतळांवर पाठवण्यात आले आहेत. हा ई-मेल मिळाल्यानंतर विमानतळ परिसराची झडती घेण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, विमानतळावर कोणतेही संशयास्पद साहित्य आढळून आले नाही.
काही दिवसांपूर्वी मुंबई आणि कोलकाता विमानतळांनाही अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. सोमवारी नागपूरसह आगरतळा, वाराणसी आणि चंदीगड येथील विमानतळांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या.
दरम्यान, याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी तपास सुरु केला आहे.