नागपूर : नागपूर-हावडा मार्गावर कामठी परिसरात रेल्वे ट्रॅकवर एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी पाच वाजता हा मृतदेह सापडला.
मृत युवकाची ओळख ईश्वर नरेंद्र कोतुलवार (वय २२, रा. बाबा बुद्धजी नगर, इंदौरा, नागपूर) अशी झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माहितीनुसार, ईश्वर कोतुलवार रायपूर येथे राहत व काम करत होता. सुट्टी निमित्त तो मंगळवारी नागपूरला आपल्या कुटुंबीयांकडे आला होता. गुरुवारी तो परत रायपूरला जाण्यासाठी निघाला होता.
नागपूर-बिलासपूर शिवनाथ एक्सप्रेसने प्रवास करत असताना गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह कामठीतील रनाळा परिसरातील शहीद नगरजवळील रेल्वे ट्रॅकवर आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो कामठी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, प्रवासादरम्यान ट्रेनमधून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा.