नागपूर: देशभरात पुन्हा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. यातही ‘जेएन १’ या नवीन व्हेरियंटमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यात करोनाचे निदान झालेल्या २० रुग्णांमध्ये ‘जेएन १’ हा विषाणूचा उपप्रकार आढळल्याने एकच खळबळ उडाली. या वृत्ताला आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे.
नागपुरात प्रथमच या उपप्रकाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या एकूण २० रुग्णांपैकी १० रुग्ण हे जेएन १ आणि १० रुग्ण हे जेएन १.१ या उपप्रकाराचे आहेत. २० पैकी १२ रुग्ण करोनामुक्त झाले असून ८ रुग्ण क्वारंटाइन आहेत. या आठही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
शुक्रवारी २४ तासांत शहरात ३ नवीन करोनाग्रस्त आढळले. दिवसभरात शहरात ११ आणि ग्रामीणला १ असे एकूण १२ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे शुक्रवारी शहरात ४२ आणि ग्रामीणला ११ असे एकूण ५२ सक्रिय करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहे.