नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात गुन्हेगारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यातच आज नागपूरच्या कंट्रोल रूमला फोन करून कॉटन मार्केट येथील इंदिरा गांधी झोपडपट्टीत चार महिलांची हत्या झाल्याची माहिती देण्यात आली. या कॉलनंतर नागपूर पोलिसांची झोपच उडाली.
नागपूरच्या सीपीसह डीसीपींनी देखील याप्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तपासाच्या हालचाली सुरु केल्या.
या घटनेची माहिती मिळताच डीसीपी भामरे यांच्यासह पोलीस पथक,गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कॉटन मार्केट येथील झोपडपट्टीत व्यापक छापे टाकले. तपास सुरू केला मात्र अनेक तासांच्या तपासानंतरही तेथे असे काहीही आढळून आले नाही.
त्यानंतर पोलिसांना समजले की हा फेक कॉल आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी हा कॉल कंट्रोल रूममध्ये करण्यात आला.
जेव्हा पोलिसांनी त्या नंबरवर कॉल केला तेव्हा त्यांना कळले की तो नंबर देखील बंद आहे पोलिसांचे म्हणणे आहे की जर हा कॉल फेक असेल तर संबंधित व्यक्तीवर फेक कॉलचा गुन्हा दाखल करण्यात येईल. त्या अनुषंगाने पोलिसांनी फेक कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.