पारशिवनी : मागील सत्र २०१८-१९ मध्ये विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पंचायत समिती पारशिवनी मध्ये घेण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पा मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झालेल्या वाढीचे तंत्र समजून घेण्यासाठी आफ्रिका खंडातील तबोत्सवाना देशातील ‘ यंग लव्ह’ फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी नुकतीच पाराशिवनी तालुका ची गोडेगाव जि प सर्कल अर्न्तगत डोरली ग्राम पंचायत व करंभाड जिं प क्षेत्रातील इटगाव ग्राम पंचायत येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यां सोबत रममाण होऊन त्यांच्या शिकण्याचे तंत्र जाणून घेतलेत.
२०१८ – १९ मध्ये नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सुरू केलेल्या पथदर्शी प्रकल्पासाठी पारशिवनी तालुक्याची निवड केली होती. त्यासाठी ‘ प्रथम ‘ ह्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ‘ *असर* ‘ सर्वेक्षणाचे टूल्स वापरून सीआरजी ग्रुपच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात भाषा विषयातील प्रारंभिक, अक्षर, शब्द, परिच्छेद व गोष्ट या स्तरावर आणि गणित या विषयातील प्रारंभिक, एक अंकी संख्या, दोन अंकी संख्या, वजाबाकी, भागाकार या स्तरावर विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करून घेतली.
डॉ. संजीकुमार यांनी पुढील ध्येय निश्चित करण्यासाठी जि प नागपुर चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रवींद्र रमतकर, शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पाटवे, चिंतामण वंजारी, पाराशिवनी गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे, गटशिक्षणाधिकारी विलास काटोले , पथदर्शी प्रकल्प तालुका प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे यांचे समवेत सर्व शिक्षक व केंद्रप्रमुख यांची कार्यशाळा घेतली. एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या अंतिम चाचणीत भाषा व गणित विषयात २५ ते ३० टक्के वाढ दिसून आली. ह्या बदलाची नोंद घेऊन हा प्रकल्प विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात या शैक्षणिक वर्षापासून सुरू केला.
विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययन प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना या देशातील ‘ यंग लव्ह’ फाउंडेशनच्या नॉम सर, मॉत्शेती मॅडम, सनशाइन मॅडम, थातो मॅडम आणि ‘ प्रथम ‘ च्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सौमुक्ता आणि संचालिका उषा मॅडम यांनी पारशिवनी तालुक्यातील डोरली व इटगाव या जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच यांचेशी संवाद साधला. आफ्रिकन चमूनी विद्यार्थ्यांचे स्तरनिहाय गट, शैक्षणिक साहित्य, शिक्षक – विद्यार्थी आंतरक्रिया, विद्यार्थ्यांचा सामाजिक स्तर, विद्यार्थी गणवेश, अध्यापन पद्धती, पालक सहभाग, समाज सहभाग या मुद्द्यांवर संबंधितांशी चर्चा करून या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करून मुक्त कंठाने प्रशंसा केली.
विद्यार्थी आग्रहास्तव विदेशी पाहुण्यांचे नृत्य
या विदेशी पाहुण्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उत्सुकता होती. विद्यार्थ्यांनी विदेशी पाहुण्यांना त्यांचे नृत्य करण्याचा आग्रह केला.आणि विदेशी पाहुण्यांनी त्यांच्या देशातील प्रसिद्ध गाण्यावर ताल धरला. भाषेची अडचण असली तरी हावभावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोबत नृत्य करून मनमुराद आनंद लुटला.
या भेटीप्रसंगी गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, प्रभारी विजय बंसोड, मारोती मसराम उपस्थित होते.