नागपूर. विदर्भ अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि. नागपूर यांच्या वतीने शेगाव येथे सोमवार १० फेब्रुवारी व मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी विदर्भातील नागरी सहकारी बँकांच्या संचालकांकरिता दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भातील सर्वच बँकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासंदर्भात सर्व नागरी सहकारी बँकांना एकत्र आणण्याकरिता व कामात एकरुपता आणण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली होती.
सोमवारी १० फेब्रुवारी रोजी राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. तर मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी गृह व सहकार राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. दोन्ही कार्यक्रमांमध्ये विदर्भ अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र दुरुगकर, उपाध्यक्ष सतीश गुप्त, सचिव तुषारकांती डबले, सहसचिव सुभाष देवाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये नागरी सहकारी बँकांच्या संदर्भात बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमधील अद्ययावत बदलांबाबत तसेच को-ऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच रिझर्व्ह बँकेचे उपमहाप्रबंधक यू. श्रीनाथ यांनी संचालकांची जबाबदारी व नियमन तत्वे या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. दोन दिवसीय कार्यशाळेअंतर्गत उत्कृष्ट बँक स्पर्धा घेण्यात आली. तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या नागरी सहकारी बँकांना राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यशाळेमध्ये विदर्भ अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि. नागपूरचे सर्व संचालक मंडळ तसेच विदर्भातील सदस्य नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक गण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय वंधारे यांच्या नेतृत्वात सर्व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन असोसिएशनचे सहसचिव सुभाष देवाळकर यांनी केले व शेवटी त्यांनी आभारही मानले.