नागपूर: पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांची शिस्तपालन समितीने पक्षातून सहा वर्षांकरिता हकालपट्टी केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नरेंद्र जिचकार यांच्या प्रकरणी सुनावणी केली. जिचकार यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल आणि गैरवर्तणुकीबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. जिचकार यांनी नोटीसला २३ ऑक्टोबर २०२३ रोजी उत्तर दिले. समितीला त्यांचे उत्तर समाधानकारक वाटले नाही. जिचकार यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला व प्राथमिक सदस्य पदावरून तात्काळ प्रभावाने सहा वर्षांकरिता काढून टाकण्यात आले.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विभागीय आढावा बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत जिचकार यांनी बोलण्याची संधी मिळावी म्हणून शहर अध्यक्षांच्या हातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावरून ठाकरे आणि जिचकार यांच्यात मोठा वाद पेटला होता. नंतर हा वाद प्रदेश शिस्तपालन समितीकडे गेला होता.