नागपूर – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या 2 आमदारांवर मोठी कारवाई केली आहे. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधान परिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते.
त्यात महायुतीला फायदा झाला होता. ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांची नावे आम्हाला माहिती झाली आहे. हायकमांडकडे या नावांची यादी पोहचली असून त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा दिला होता.
आज नाना पटोलेंनी अंतापूरकर आणि सिद्दीकींची पक्षातून हकालपट्टी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार होते. परंतु नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवेळी झिशान सिद्दीकी यांनी त्यांचे स्वागत केले, मतदारसंघात यात्रेत सहभागी झाले त्यावरून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार हे जवळपास निश्चित झाले होते.
त्यातच आज सकाळी जितेश अंतापूरकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जितेश अंतापूरकर हे भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.