नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नागपूर हिवाळी अधिवेशन दोन दिवसांनी वाढवण्याची मागणी केली आहे. विदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने हा निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.
विदर्भाचे प्रश्न आम्ही २९३ अंतर्गत सभागृहात मांडले आहेत. मात्र सरकारने त्यावर भाष्य केले नाही. विदर्भाच्या प्रश्नांची यादी मोठी आहे. विदर्भ विकास महामंडळ कार्यरत नाही. त्यामुळे दोन दिवस अधिवेशन वाढविण्याची गरज आहे, असे नाना पटोले म्हणाले.
संसदेत झालेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षाच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आले. यावर पटोले यांनी संताप व्यक्त केला. भाजपला लोकशाही मान्य नाही. मोदी सरकारने दहा वर्षांत विकास केला असेल तर त्यांना रथयात्रा काढण्याची गरज नाही. या सरकारने देशाला लुटले असून हे पाप लपविण्यासाठी रथयात्रा काढण्यात येत आहे. धार्मिकतेच्या मुद्यावर मोदी सरकार लोकांना गुंतवून ठेवत आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी गरीब असल्यानेच इतक्या मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी केला.