कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भामेवाडा गावातील बहुधा शेतकऱयांनी हरभरा पिकाची शेती केली .कुणी दहा एकर तर कुणी वीस एकरात हरभरा पिकासह इतर पिकाची सुद्धा शेती केली आहे .मात्र मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी हलक्या पावसाने तसेच ढगाळ वातावरणासह सकाळच्या धुक्यामुळे ऐन वेळी हरभरा पिके हिरवेगार व फुलोऱ्यावर येणाच्या तोंडावरच हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हरभरा पूर्णता सुकला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भामेवाडा गावातील शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यानुसार भामेवाडा गावातील नितीन बांगळे यांच्या शेतातील 20 एकर जागेतील पेरलेले हरभरा पिकाचे नुकसान झाले तसेच धर्मराज फुकट, विनायक फुकट यासारख्या कित्येक शेतकऱ्यांचे हरभरा पिकाचे नुकसान झाले असून जवळपास 200 हॅकटर क्षेत्रातील हरभरा पिकाचे नुकसान झाल्याने या गावातील बळीराजा हवालदिल झाल्याने या चिंताग्रस्त शेतकऱ्याला संबंधित प्रशासन नुकसान भरपाई देणार का? 33 टक्के नुकसानीचे निकशाच्या नावाखाली नुकसान भरपाई पासून वंचित तर ठेवनार नाही ना?अशा विविध प्रकारच्या विवंचनेत शेतकरी अडकलेला आहे.
यावर्षी कामठी तालुक्यातील भामेवाडा गावातील शेतकऱ्यावर निसर्गाची अवकृपा झालेली आहे .परतीच्या पावसाने खरिपाचे हातात येणारे पीक वाहून गेले त्यामुळे कामठी तालुक्यातील भामेवाडा गावासह इतरही गावातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कामठी तालुक्यातील भामेवाडा गावासह इतर गावात खरिपाची पेरणी उशिरा झाल्याने व त्यातच झालेंल्या परतीच्या पावसाने ऐन वेळी शेतकऱ्यांच्या हातात येणारे मुख्यत्वे धान पीक तसेच सोयाबीन पिकाचे चांगलेच नुकसान झाले .या पावसाच्या उघडणीनंतर रब्बी हंगामात नुकसान भरपाई भरून निघेल अशा विवंचनेत तुरीचे पीक बहरेल असा अंदाज होता मात्र मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी हलक्या पावसाने तसेच निसर्गाच्या ढगाळ वातावरणाने भामेवाडा गावातील तुरीचा खराटा झाला त्यातच हरभरा पीकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जवळपास 200 हॅकटर क्षेत्रातील हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले.
खरीप गेले तर गेले पण रब्बी तरी चांगली येईल अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली होती .मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या ढगाळ वातावरणा मुळे रब्बी ज्वारीवर लष्करी अळीने हल्ला केला असुन यासारखे रब्बी चे पिके हाती येणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच तूर, हरभरा यासारखेचपीक उगवून आले असुन त्यावरही अळीचा प्रादुर्भाव झाल्याने रब्बी पिकाचे नुकसान होऊ लागले आहे ज्याची नुकसानीची प्रचिती तालुक्यातील भामेवाडा गावात दिसून येते त्यामुळे खरीप गेले ते गेले परंतु रब्बीही धोक्यात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांची सगळीच भिस्त ही शेतीवर असल्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा कुठलाही विसावा न घेता थंडी , ऊन पाऊस, वारा ह्यावर मात करीत आपल्या काळ्या आईची रात्रंदिवस प्रमाणिकतेने सेवा करोत असतो यानुसार कामठी तालुक्यातील भामेवाडा गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा याच प्रकारची काळ्या आईची सेवा केली निसर्गाच्या अवकृपेमुळे खरिपाचे नुकसान झाले तरीसुद्धा आत्मविश्वास मजबुत ठेवून रब्बो हंगामात भर निघणार या आशेने रब्बी हंगामातील पिकावर जोर दिला मात्र या रब्बी हंगामातही निसर्गाने दिलेल्या दगा मुळे शेतकऱ्यांचे हरभरा पिकासह इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर कपाळावर हात ठेवुन विचार करण्याची पाळी आली आहे त्यातच कित्येक संतप्त शेतकऱ्यांनी उभ्या शेतातील नुकसान पाहून शेतात बुलडोजर चालवून शेतीच भुईसपाट केल्याचे सांगण्यात येते.
बॉक्स:-जी प सदस्य प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे-कामठी तालुक्यातील भामेवाडा गावातील शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त परिस्थिती लक्षात घेता तालुका कृषी विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करीत शेतकऱ्यांची खातेदार शेतकरी निहाय पाहणी करून निसर्गाच्या अवकृपेमुळे कामठी तालुक्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी.
जी प सदस्य अनिल निधान:- शेतकरी सुखी तर देश सुखी या प्रचलित म्हणी नुसार निसर्गाच्या अवकृपेमुळे कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय स्थिती झाली असून निकषांच्या कक्षेत नुकसान भरपाई बसतनाही अशा विविध कारणांची बतावणी करीत तालुक्यातील शेतकऱ्यांचे वास्तविकता नुकसान होऊनही नुकसान भरपाई मिळालेली नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल त्यातच भामेवाडा गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या हरभरा पिकाची नुकसान भरपाई होऊन शेतकरी वर्ग दुखवलेला आहे तेव्हा संबंधित तालुका कृषी विभागाने यानुकसानीची गंभीर दखल घेत समस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी ….
संदीप कांबळे कामठी