सोलापूर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यापार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रातचा दौरा करत आहेत. ते सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
सोलापुरात बोलतांना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील.
जर अशीच दडपशाही सुरु राहिल्यास आधी दोन कोटी मराठे एकत्रित आले होते, आता हाक दिल्यास चार कोटी मराठे एकत्रित येऊन त्यांना पाणी पाजतील, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली. शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात येत असलेल्या कुणबी नोंदींची संख्या आणखी वाढली असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. यापूर्वी 57 लाख नोंदी सापडल्याचा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता याच नोंदी वाढल्या असून, आकडा 63 लाखांवर पोहचला असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासह सुमारे 1 कोटी लोकांना आरक्षण मिळणार आहे. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांनाही सगेसोयरे कायद्यानुसार आरक्षण मिळेल असेही ते म्हणाले.