नागपूर – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नागपूर जिल्ह्यात मोठा बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी फसव्या कागदपत्रांच्या आधारे नागपूर शहरात अधिकृत प्रमाणपत्रे मिळवली आहेत. सोमय्यांच्या मते, एकूण 1234 लोकांनी अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे सर्टिफिकेट मिळवले आहेत.
गुरुवारी नागपूर दौऱ्यावर असताना किरीट सोमय्या यांनी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी तसेच तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या एनओसी आणि प्रमाणपत्रांबाबत सविस्तर चर्चा झाली.
सोमय्या म्हणाले की, तहसीलदार कार्यालयाकडून 1234 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले, तर मनपा कडून केवळ 639 लोकांना एनओसी देण्यात आली होती. म्हणजेच 595 लोकांनी फर्जी एनओसीच्या आधारे प्रमाणपत्रे मिळवली आहेत.
त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळलेल्या व्यक्तींची सर्टिफिकेटे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ज्यांनी या घोटाळ्यात सहभाग घेतला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजप नेत्यांनी हा मुद्दा गंभीरतेने घेत राज्यभरात अशा प्रकारच्या प्रकरणांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.