नागपूर : गेल्या काही काळात बनावट नोटा छापण्याचे अनेक प्रकार उघड झालेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई करुन बनावट नोटा छापण्याचे प्रकार उधळून लावले आहेत. आता नागपूरमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील जरीपटका परिसरातील चॉक्स कॉलनीत बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरु होता. त्या कारखान्यातून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात आल्या असून त्या नोटा देशातील १० ते १५ राज्यात चलनासाठी पाठविण्यात आल्या.
मध्यप्रदेश पोलिसांनी नागपुरात छापा घालून टोळीच्या मुख्य सूत्रधारांना अटक केली. मलकीत सिंह गुरमेश सिंह विर्क (चॉक्स कॉलोनी, कामठी रोड, नागपूर) आणि मनप्रीतसिंह कुलविंदरसिंह विर्क (२६ चॉक्स कालोनी) अशी आरोपींची नावे आहेत.
या टोळीतील ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली.जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलकीतसिंह विर्क आणि मनप्रीतसिंह विर्क यांनी झटपट पैसा कमविण्यासाठी सोपा मार्ग म्हणून बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच हुबेहुब नोटा छापणाऱ्या मशिन्ससुद्धा विकत आणल्या. गेल्या अनेक दिवसांपासून जरीपटक्यात हा कारखाना सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.