नागपूर : जरीपटका पुलीस स्टेशन अंतर्गत इंदोरा परिसरात मठ मोहल्ला येथे हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. वकील अश्विन वासनिक याने आपल्या मुलासोबत मिळून पक्षकाराचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली.हरीश दिवाकर कराडे (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर वकीलअश्विन वासनिक आणि मुलगा अविष्कार वासनिक असे आरोपी बापलेकांचे नाव आहे. मृतक कराडे हे वायुसेनचे रिटायर्ड कर्मचारी आहेत.
माहितीनुसार, वकील अश्विन वासनिक याने आपला पक्षकार असलेले हरीश कराडे यांना काल आपल्या घरी बोलावले होते. कराडे यांना वासनिक यांच्याकडे त्यांची शेती लाखो रुपयात गहाण ठेवली आहे. यावरून या दोघांमध्येही मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. काल रात्री वकील अश्विन वासनिक आणि कराडे यांनी दारूची पार्टी केली. याचदरम्यान दोघांमध्ये वाद पेटला. हा वाद इतका विकोपाला गेला की, वकील अश्विन वासनिक याने आपल्या मुलासोबत मिळून कुऱ्हाडी ने वार करत कराडे यांची हत्या केली. या घटनेनंतर वकील अश्विन वासनिक याने आज सकाळी जरीपटका पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.