नागपूर : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. एका गाण्याच्या माध्यमातून कामरा याने शिंदे यांना गद्दार म्हणून संबोधित केल्याच्या आरोपावरून मोठा वाद पेटला आहे.
शिंदेंच्या समर्थकांनी त्याचा शो ज्या स्टुडिओमध्ये झाला तिथेच जाऊन तोडफोड केली. दरम्यान, या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने शिंदेंवर केलेली टीका काय?
जे यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी केले ना, बोलावं लागेल. याठिकाणी त्यांनी आधी काय केलं? आधी शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. मग एनसीपीतून एनसीपी बाहेर आली.
एका मतदाराला नऊ बटणं दिली. सर्वजण कन्फ्युज झाले. चालू एकाने केलं, ते मुंबईत खूप मोठा जिल्हा आहे.. ठाणे.. तिथले आहेत,असे तो म्हणतो. यानंतर तो शाहरुख खानच्या ‘भोली सी सुरत.. आँखो में मस्ती’ या गाण्याच्या चालीवर स्वत: बनवलेलं गाणं गाऊ लागतो. त्याच्या या गाण्यात शिंदेंना अप्रत्यक्षपणे गद्दार म्हणून संबोधित केले आहे.