नागपूर: 4 मे महाराष्ट्र कॉटन जीनिंग असो.च्या एका शिष्टमंडळाने नुकतेच केंद्रीय महामार्ग, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना एक निवेदन दिले होते. या निवेदनातील मागण्यांसंदर्भात गडकरी केंद्रीय मंत्री यांनी स्मृती इराणी यांच्याशी चर्चा करून या निवेदनातील शिष्टमंडणाच्या मागण्या पूर्ण होतील या दृष्टीने प्रयत्न केले. यामुळे शेतकरी व महाराष्ट्र कॉटन जीनिंग असोसिएशन व कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला आर्थिक दिलासा मिळणार आहे.
विदर्भातील कॉटन जीनिंग व्यावसायिकांनी काही कारणास्तव कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून कापसातील लिंट व रुई वेगळे करण्यासाठी घेण्यात येणार्या कापसाची आवक कमी झाली होती. कोरोनामुळे या कालावधीत ही आवक कमी झाली होती. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने विदर्भातील जीनिंग व्यावसायिकांना मार्च महिन्यात कापसातून 34 टक्के लिंट व 66 टक्के रुई काढून देण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापुढील एप्रिल, मे आणि जूनमध्ये 34.5 टक्क, 35 टक्के व त्याहून अधिक अशी वाढ होणार होती. मात्र कापूस ओला झाल्यामुळे व कापूस खरेदी कमी झाल्यामुळे या व्यावसायिकांकडून दिलेले लक्ष्य पूर्ण होऊ शकले नाही. यात 0.5 टक्का सूट देण्याची विनंती असोसिएनच्या शिष्टमंडळाने गडकरी यांना केली होती.
जीनिंग व्यावसायिक, शेतकरी आणि सीसीआय यांच्या आर्थिक हित लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याशी संपर्क साधून जीनिंग व्यावसायिकांना मार्चमध्ये ठरलेल्या दरात 0.5 टक्का वाढ करून लिंट व रुई काढून देण्याचे काम दिले. त्यामुळे शेतकर्यांकडे पडून असलेला 25 टक्के कापूस बाजारात येऊ शकला व त्याचा परतावा शेतकर्यांना मिळणार आहे.
तसेच जनिंग व्यावसायिकांना सीसीआयतर्फे या कंत्राटामुळे काम प्राप्त झाले असून त्यांच्याकडील कामगारांना रोजगार प्राप्त झाला. तसेच सीसीआयला यंदा कापसाच्या गाठींचे लक्ष्य पूर्ण करणे शक्य होणार आहे. कापूस, लिंट, रुईची गरज पूर्ण होईल व त्यानंतर त्याची निर्यात करणेही शक्य होणार आहे.