अतिवृष्टी भागात पंचनामे करण्याचे निर्देश
नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल तर तातडीने निश्चित करण्यात आलेल्या पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.
शासनाने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 साठी जिल्ह्यात व तालुका स्तरावर विमा कंपनीचे प्रतिनिधी नियुक्त केले आहे. यापूर्वीच पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी या अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले असेल तर संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीपसाठी मंजुरी प्राप्त झाली असून प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांना विमा कवच बहाल करण्यात येते. याशिवाय पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ व पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन दुष्काळ पावसातील खंड आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट आधी बाबींकरिता नुकसान भरपाई देणार आहेत.योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची मुदत 23 जुलै पर्यंत होती. या मुदतीपर्यंत ज्यांनी अर्ज केले आहे. त्यांनी 72 तासांच्या आत विमा कंपनीकडे अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी दावा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
खरीप हंगाम 2021 मध्ये योजना विमा जिल्ह्यांमध्ये रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कंपनी लि. मुंबई या कंपनीकडून राबविण्यात येत आहे. विमा कंपनीचा दूरध्वनी क्रमांक 022-68623005 असून टोल फ्री क्रमांक 18001024088 हा आहे.
जिल्हा व तालुकास्तरावर विमा कंपनीमार्फत नियुक्त करण्यात आलेले विमा कंपनी प्रतिनिधीची नावे जिल्हा समन्वयक शिवजीत सहाय- 7889778700, नागपूर ग्रामीण- रोहीत मुनिश्वर 8149050168, कामठी- नयन सावदे 9075203717, हिंगणा- प्रणय निंबुरकर 8999826577,, सावनेर- रवींद्र उईके 9022469878, काटोल- शैलेशकुमार दिवे 9850363531, नरखेड- यश लाडे 7972071291, कळमेश्वर- अजय कछवाह 8668210558, रामटेक- सुकेश डंभारे 9552139810, मौदा- अविनाश वाकलकर 9284888740, पारशिवनी- विभोर राऊत 9834822467, उमरेड- विजय राठोड 9325922665, भिवापूर गणेश रोहनकर, 9284367316, कुही- शुध्दोधन गायकवाड 9021714854 असे आहे. या प्रतिनिधींना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दूरध्वनी करून दावा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पंचनामे करण्यात यावे
अतिवृष्टी दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या वित्त व जीवित हानी बाबत पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती नियंत्रणात असून अतिवृष्टीमध्ये ज्या भागात नुकसान झाले आहे. त्या भागातील पंचनामे पूर्ण करावे असे निर्देश सर्व महसूल यंत्रणेला देण्यात आले आहे.