नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने शनिवारी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये ‘फॅशन शो’ आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रेशीमबाग मैदानामध्ये मनपाच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळावा सुरु आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा. ना. श्री नितिन गडकरी केन्द्रीय मंत्री परिवहन, महामार्ग उपस्थित राहणार आहे. तसेच श्रीमती अमृता फडणवीस ही विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
समाज विकास विभागाद्वारे शहरातील महिला उद्योजिका, बचत गटातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या हेतूने रेशीमबाग मैदानात ११ मार्च पर्यंत महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी (ता. ८ मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त आणि नागपूर महानगरपालिका स्थापनेच्या अमृत महोत्सवानिमित्त रेशीमबाग मैदानावर सकाळी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांकरिता बॉक्स क्रिकेट, बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा, संगीत खुर्ची इत्यादी क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सायंकाळी ७ वाजता ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले आहे.
महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये ९ मार्च रोजी हृषिकेश रानडे व त्यांच्या चमूचे ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आले आहे. १० मार्च रोजी श्री. राजेश चिटणीस आणि त्यांच्या ग्रुपद्वारे हिंदी मराठी गाण्यांचा स्वरजल्लोष कार्यक्रम तसेच कॉमेडी तडका कार्यक्रम सादर केले जाईल. ११ मार्च रोजी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात येणार आहे. ११ मार्च रोजी महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप होईल.