Published On : Mon, Jul 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भ्रूणविज्ञान दिनानिमित्त गर्भवती मातांसाठी फॅशन शो

हवाईसुंदरी श्वेता डवरे ठरली 'मिसेस मदर अँजल'

वर्धा – सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभाग आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक भ्रूणविज्ञान दिनानिमित्त गर्भवती मातांसाठी आयोजित अभिनव फॅशन शोमध्ये विमान वाहतूक सेवेत हवाईसुंदरी राहिलेली श्वेता डवरे ‘मिसेस मदर अँजल’ विजेतेपदाची मानकरी ठरली. तर, सोनाली सागर रामधन आणि दुर्गा आशिष मिश्रा या उपविजेत्या ठरल्या. या स्पर्धेत तब्बल २३ गर्भवती माता सहभागी झाल्या होत्या.

सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गर्भवती मातांनी रॅम्प वॉक करीत लक्ष वेधून घेतले. तर, दुसऱ्या फेरीत स्त्रीत्व आणि मातृत्व यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना समयसूचक उत्तरे देत उपस्थितांना जिंकले. स्पर्धेतील विजेत्यांना उपजिल्हाधिकारी प्रियांका कर्डिले, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे व मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्या हस्ते विजेतेपदाचा मुकुट, रोख पुरस्कार, बेबी किट्स, शाल, उपयुक्त भेटवस्तू आणि वृक्षरोप देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय, सर्वच गर्भवती मातांना अतिथींच्या हस्ते रोख पुरस्कार, बेबी किट्स, भेटवस्तू व वृक्षरोप देऊन गौरविण्यात आले. आईपणाच्या मनमोहक छटा टिपण्यासाठी छायाचित्रणाची आकर्षक सुविधाही नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली होती. गर्भारपण आणि मातृत्व याबाबत असलेले परंपरागत गैरसमज दूर सारून आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुरस्कार वितरण सोहळ्याला डॉ. अलका रावेकर, कार्यकारी संचालक डॉ. तृप्ती वाघमारे, डॉ. मीना ज्योतवानी, अधिपरिचारिका माधुरी ढोरे, कार्यक्रमाच्या संयोजक तथा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रमुख डाॅ. दीप्ती श्रीवास्तव, परीक्षक डॉ. शिवाली काशीकर, डॉ. स्वरूपा चकोले, डॉ. मंजूषा अग्रवाल, डॉ. संज्योत निनावे, डॉ. मेघा, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात भ्रूणविज्ञान विशेषज्ञ डॉ. आकाश मोरे, डॉ. जरुल श्रीवास्तव, नम्रता अंजनकर व दीपाली मोरे यांचाही सत्कार करण्यात आला.

मागील आठ वर्षात सुमारे ३४० टेस्ट ट्यूब बाळांचा सावंगी मेघे रुग्णालयात जन्म झाला असून सध्या भ्रूणविज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमही मेघे अभिमत विद्यापीठात कार्यान्वित असल्याचे प्रास्ताविकात डाॅ. दीप्ती श्रीवास्तव यांनी सांगितले.

संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ. सोनाली चौहान, डॉ. अपूर्वा दवे व डॉ. आकृती शिंदे यांनी केले. प्रारंभी समीक्षा हटवार हिने गणेश वंदना आणि यशोदा व कृष्णाचे गीत सादर करून वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. धर्मेश पटेल, डॉ. साक्षी चांडक, मानस, लासी बिस्वास, खुशबु कुंडू, रंजना दिवेकर, सुरेंद्र यादव, डॉ. शीतल कांबळे, मिलिंद यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला कृत्रिम गर्भधारणा उपचारांचा लाभ घेतलेली सुमारे ७५ दांपत्ये आपल्या बाळाला घेऊन या कार्यक्रमात सहभागी झाल्याने टेस्ट ट्यूब बेबींचा मेळावा असल्याचे दृश्य सभागृहात निर्माण झाले होते.

Advertisement