बुलढाणा: यवतमाळहून शिर्डीला भाविकांना घेऊन जाणाऱ्या कारला आज शनिवारी सकाळी ८ वाजता अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील मालसावर गावात मुंबई कॉरिडॉरवर क्रूझरचा अपघात झाला.
या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आणि १० ते १२ भाविक जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या ९ जणांवर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
आज सकाळी १२ ते १५ भाविक क्रूझर कारने यवतमाळहून शिर्डीला रवाना झाले. दरम्यान, सिंदखेडराजा परिसरातील समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, ज्यात एक महिला आणि एक पुरूष यांचा समावेश आहे.
शिर्डीला जाणाऱ्या या क्रूझर कारचा टायर फुटला आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. तेव्हा मागून येणाऱ्या एका क्रेटा कारने क्रूझरला धडक दिली. सुदैवाने, क्रेटा कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.