बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीने प्रतिष्ठेच्या केलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत धंनजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक सुरेश धस हे विजयी ठरले आहे. विजयी ठरल्यानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला. तुमचा आजचा विजय धनंजय मुंडेंना दिलेला धक्का आहे का, असा प्रश्न त्यांना प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावेळी धस यांनी ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’, असे विधान करत धनंजय यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला.
या निवडणुकीत मला ‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मदत केली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीने मतांसाठी अनेक नगरसेवकांना स्मार्ट वॉच, किचेन, आयफोन वाटले होते. तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आजचा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे, असे धस यांनी म्हटले.
या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल 100 मते कमी होती. मात्र, तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण 526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 452 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली.
याशिवाय, एकाने मतदाराने नोटासाठी मतदान केले. दरम्यान बाद करण्यात आलेल्या मतांच्या मुद्द्यावरून सुरेश धस आणि अशोक जगदाळें यांच्यात मतमोजणीच्या ठिकाणीच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अशोक जगदाळे यांनी फेरमतदानाची मागणी केली आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी त्यांची मागणी मान्य करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.