चेन्नई : भारतात आलेल्या हरित क्रांतीचे जनक ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचं गुरुवारी निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. २००४ साली स्वामीनाथन यांना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.
कृषी संशोधक असलेल्या एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील तंजावूर येथे झाला होता. त्यांना 1997 मध्ये पद्मश्री, 1972 रोजी पद्मभूषण आणि साल 1989 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी जगभरात सन्मान मिळाला होता.
एम. एस. स्वामीनाथन यांचं पूर्ण नाव मन्कोम्बू सम्बासीवन आहे. ते ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे काका एम. के. नारायणस्वामी यांनी घेतली. लहानपणीच ते महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झाले.
स्वामीनाथन आयोगाने २००६ साली त्यांचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालात, शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या किमान दुप्पट असावा अशी शिफारस स्वामीनाथन आयोगाने केली होती.