नागपूर : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी आदिवासी महिलांना त्यांनी साड्यांचे वाटप केले. मात्र या साडीवरून महिलांनी संताप व्यक्त केला.
आम्हाला साडी दिली की मच्छरदाणी? असे म्हणत महिलांनी रोष व्यक्त केला. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या साड्या आहेत की मच्छरदान्या, असा प्रश्न त्यांना पडला आहे. साड्यांचे वाटप करायचे होते, तर चांगल्या साड्या द्यायचा, असेही या महिलांनी म्हटले आहे. राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून त्या अजिबात घालण्याच्या लायकीच्या नाही, असा संताप देखील आदिवासी महिलांनी व्यक्त केला.
महिलांनी केलेल्या गंभीर आरोपावर युवा स्वाभिमान पक्षातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या साड्या नसल्याचा दावा राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे करण्यात आला आहे.या व्हायरल झालेल्या व्हिडीओत मात्र मेळघाट परिसरातील काही आदिवासी महिला दिसून येत आहेत. त्यांच्या हातात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे फोटो असलेली बॅग दिसून येत आहे. सोबतच महिलांच्या हातात वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देखील आहेत. या साड्यांचा वापर घालण्यासाठी करावा, की मच्छरदानी म्हणून तिचा वापर करावा, असा सवाल महिलांनी उपस्थित केला.