लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४९ जागांसाठी मतदान होणार आहे.तर महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे अशा १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. राज्यातून अनेक दिग्ग्जांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबईच्या राजकीय आखाड्यात माजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांचे नशीब आज मतदान पेटीत बंद होणार आहे.
मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. महायुतीने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून ॲड. उज्ज्वल निकम यांना दिलेली उमेदवारी केंद्रस्थानी आहे. दक्षिण मध्य मतदारसंघात आघाडीकडून अनिल देसाई यांची ताकद पणाला लागली आहे. उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत दाखल झालेले आमदार रवींद्र वायकर यांची प्रतिष्ठा मुंबई उत्तर पश्चिमेत पणाला लागली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी टक्के मतदान –
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी टक्के मतदान पाचव्या टप्प्यातील देशभरातील सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे आकडेवारी बिहार – 8.86 %,जम्मू आणि काश्मीर – 7.63 % ,झारखंड – 11.68 %,लडाख -10.51 %, महाराष्ट्र – 6.33 %, ओडिसा – 6.87 %,उत्तर प्रदेश – 12.89 %, पश्चिम बंगाल – 15.35 इतके टक्के मतदान पार पडले.