नागपूर :शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात बांधकाम कामगार कल्याण योजेनच्या शिबिरादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर अनेक महिला जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी भाजप व महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच मृताचे नातेवाईक व जखमींना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (उबाठा) किशोर कुमेरिया यांनी केली.
रेशिमबाग चौकातील शिवसेनेच्या कार्यालयासमोर शेकडो शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध करत भाजप विरोधात घोषणा दिल्या. पालकमंत्र्यांनी दबाव टाकून या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याविरुद्ध कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. शिबिराच्या आयोजनात निष्काळजीपणा असल्यामुळे भाजप व कामगार मंडळाविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. शिबिर व्यवस्थापक, भाजप पदाधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पोलिस स्टेशनला घेराव घालू असा इशारा शिवसैनिकांनी दिला.
आंदोलनात ठाकरे गटाच्या महिला संघटिका अंजुशा बोधनकर, सुशिला नायर, अजय दलाल, अतुल सेनाड, संदीप रियाल पटेल, राजेश कनोजीया, किशोर ठाकरे, हरिभाऊ बनाईत, महेंद्र कठाने, श्याम तेलंग, विकास देशमुख, वसंता डोंगरे, सुखदेव ढोके, राजू दळवी, निखिल जाजुरवार, प्रदीप तुपकर, राजू रुईकर, अक्षय ताजणे, पांडुरंग हिवराळे, सुमीत कपाटे, राजेश बांडाबुचे व अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.