– महाराष्ट्रात वीज संकट का उद्भवले ?
– कोराडी विद्युत निर्मिती प्रकल्पाचे नूतनीकरण थांबविले
नागपूर : अवघ्या तीन वर्षांपूर्वी पाचवे लोडशेडींगमुक्त राज्य म्हणून गौरविण्यात आलेला महाराष्ट्र काळोखात हरविण्याची चिन्हं आहेत. अशी भीती राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. ऊर्जा मंत्रालयाला त्वरित वीज निर्मितीचे नियोजन करावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
मागील तीन महिन्यात महाराष्ट्रात वाढलेल्या अघोषित लोडशेडींगच्या पार्श्वभूमीवर आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, वीजेच्या संकटावर तोडगा न काढल्यास अख्खं राज्य अंधारात जाऊ शकते. महाजेनको कंपनीची वीज निर्मितीची क्षमता साधारणतः सात हजार मेगावॅटच्या वर असताना ती ५ हजार मेगावॅटवर घसरली आहे. हे नुकसान केवळ नियोजनाचा अभाव असल्याने होत आहे. कोयना विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजनाची देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातील जुने संच पाडून दोन अत्याधुनिक संच उभारण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने आदेश पारित केले. तब्बल १३०० मेगावॅट विद्युत निर्मिती यातून शक्य होती. परंतु मा. फडणवीस सरकारच्या आदेशांना महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. राज्यातील ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील काही संच ३० ते ४० वर्ष जुने आहेत. आवश्यक तेवढा कोळसा देऊनही विजेची निर्मिती करीत नसताना कुठलाही विचार न करता, महत्वाच्या वीज निर्मिती प्रकल्पांना स्थगिती देण्याचे धोरण चुकीचे असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात राज्यात तब्बल २५ हजार मेगा वॅटची निर्मिती होत असल्याची माहिती यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. परंतु वीज निर्मितीचा उच्चांक गाठत असतानाही कुठेही नियोजन गडबडले नाही. आज महाराष्ट्रात ५०० ते ७०० मेगावॅटचे लोडशेडींग अधिकृतपणे होत असून सुमारे १२०० मेगावॅट लोडशेडींग अनधिकृत होत असल्याची आकडेवारी त्यांनी सांगितली. विजेचा दाब कमी झाला म्हणून अचानक लोडशेडींग होण्याचे प्रमाण वाढले असून ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा ४ ते ६ तासांच्या लोडशेडींगचा सामना करावा लागण्याची शक्यता यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
उद्योगांवर होणार मोठा परिणाम
गेल्या काही महिन्यात शहरातील वीज अचानक खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा मोठा परिणाम औद्योगिकीकारणावर होणार असल्याची चिंता यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. राज्यातील काही भागात ट्रान्स्फार्मर बंद पडल्यास आठवडाभर अंधारात राहावे लागत असल्याचे यावेळी ते म्हणाले.