नागपूर: रामझुल्या खालील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही आग लागली. विशेष म्हणजे जवळच पार्किंग आहे. त्यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या कडे कोणाचेही लक्ष नाही.
रामझुल्याच्या खाली अघोषित कचराघर तयार झाले आहे. निर्जन परिसर असल्याने कचरा टाकण्यात ते सर्वात उपयुक्त ठिकाण बनले आहे. हा परिसर नशेखोरांचा तर अड्डाच बनला आहे. त्यांनी पुलाखालीच आपले संसार थाटले असून येथे जेवनही तयार केले जाते. कुणी तक्रार केल्यास ते काहीकाळ भूमिगत होतात खरे. मात्र, पुन्हा येथेच परत येतात. या अवैध कचराघरात प्लॉस्टीकसह अनेक ज्वलनशील टाकावू पदार्थांचा समावेश असतो. येथे सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे सिमेंटचे काम कमकुवत होत आहे. येथे आगीच्या घटना सातत्याने होत आहेत.
मात्र, रेल्वे, मनपा किंवा इतर कोणतेही प्रशासन या घटनांना फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. उल्लेखनिय असे की, या भागात रेल्वे मेल सर्व्हीस आणि आणि इतरही कार्यालये आहे. एखादवेळी ही आग पसरून रेल्वेचे मोठे नुकसान होउ शकते. विशेष म्हणजे देशात स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र, या कचराघराची साफसफाई करण्यासाठी आजवर कोणतेच प्रशासन पुढे सरसावले नाही.